मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर आली असून शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लान बी तयार ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला
दोन्ही गटाची सविस्तरपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर येत्या १० जानेवारीला यासंदर्भातील निकाल देण्यात येणार आहे. मात्र, या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं. किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील, अशी रणनीती भाजपने आखल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. कोर्ट यावर काय निर्णय घेईल, याकडे देखील भाजपचे लक्ष असेल.