मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं आपल्या मित्र पक्षांविरोधातच ऑपरेशन लोटस यशस्वी केलंय. अजितदादांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडलं असून शिंदेसेनेलाही धक्का दिलाय.
महायुतीत स्वबळाच्या रस्सीखेचमुळे थेट मित्र पक्षांमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोलापुरातल्या 22 नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय.
तर शिंदेंसेनेच्या 2 नेत्यांनी भाजपची वाट धरलीय. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय. सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनीही भाजपात पक्षप्रवेश केलाय.
तर 2019 चे मोहोळ विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार आणि सध्या शिंदेसेनेत असलेले नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा सोमेश क्षीरसागर यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलयं. राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात पक्षप्रवेश देऊन सहकाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याची रणनिती भाजपनं आखलीय.
दोन दिवसांपूर्वीच अमित शाहांनी भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नसल्याचं सूचक विधान केलं होतं. आता या कुबड्या दूर करण्याचंच धोरण भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबवायला सुरूवात केलीय का याचीच चर्चा या निमित्तानं रंगलीय.















Discussion about this post