मुंबई : महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १५ हजार रुपयांचे वित्तीय सहाय्य मिळणार आहे. याबाबत माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावें यांनी दिली आहे.
स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री खरेदीसाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी (DBT) द्वारे निधी जमा केला जाईल. या योजनेत आतापर्यंत फक्त १,००० रुपये सहाय्य देण्यात येत होते, मात्र तब्बल तीस वर्षानंतर टूलकिट खरेदीच्या रकमेतील १५ पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती आपल्या कौशल्यानुसार शिवणकाम, संगणक सेवा, ब्यूटी पार्लर, हस्तकला अशा विविध व्यवसायांमध्ये स्वयंरोजगार करू शकतात.
योजनेसाठी अर्जदार https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात तब्बल २९ लाख ६३ हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. या योजनेतून फक्त आर्थिक सहाय्यच नाही तर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.
याशिवाय, दिव्यांगांना नोकरभरतीमध्ये पदोन्नतीसाठी ४% आरक्षण आणि जिल्हा वार्षिक योजनेतून निधीही मिळतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे युडीआयडी असणे अनिवार्य आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याची आणि व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.















Discussion about this post