मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल- केशरी रेशन कार्डधारक) शेतकऱ्यांना रेशनसाठी दरमहा १५० रुपयांऐवजी आता १७० रुपये बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. ८ लाख कार्डधारकांना म्हणजे एकूण ३२ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
अन्य शेतकऱ्यांप्रमाणे याही शेतकऱ्यांना पूर्वी तीन रुपये किलो तांदूळ, तर दोन रुपये दराने गहू दिला जात असे. मात्र, या योजनेत गहू, तांदूळ पुरवता येणार नाही, असे भारतीय अन्न महामंडळाने 39 में २०२२ रोजी राज्य सरकारला कळविले. त्यामुळे १४ जिल्ह्यांमधील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना रेशन खरेदीसाठी दरमहा १५० रुपये देण्याची योजना २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. आता त्यात प्रत्येक लाभार्थीमागे २० रुपयांची वाढ करून ही रक्कम १७० रुपये करण्यात आली आहे
वर्षाकाठी ६५२ कोटींचा अतिरिक्त भार
एका कुटुंबात किमान चार लाभार्थी असतात हे लक्षात घेता आठ लाख कार्ड- धारकांच्या कुटुंबांतील ३२ लाख जणांना अधिकची रक्कम मिळेल. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आधी महिन्याकाठी ४८ कोटी, तर वर्षाकाठी ५७६ कोटी रुपयांचा खर्च यायचा. आता महिन्याकाठी ५४.४० कोटी आणि वर्षाकाठी ६५२ कोटी ८० लाख रुपये अतिरिक्त भार पडणार आहे.
हे आहेत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे
वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव.















Discussion about this post