उद्या २३ फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सन २०२६-२७ साठीचा राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात येणार आहे. कनिष्ठ सभागृहात (विधानसभा) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील, तर वरिष्ठ सभागृहात (विधानपरिषद) मंत्री आशिष जयस्वाल हे अर्थसंकल्प सादर करतील.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा असणार आहे. मात्र, दोन्ही सभागृहात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उणिव भासणार आहे.
हे मुद्दे गाजणार
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्दे गाजणार आहेत. अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच राज्यातील अल्पसंख्याक संस्थांना प्रमाणपत्र वाटप, मुलुंडमधील मेट्रो दुर्घटना, मंत्र्यांच्या दालनात उघड झालेली लाचखोरी, अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने मुस्लिम समाजाचे पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय यासंह आदी मुद्यांवर विरोधक सभागृहात सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती करतील.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाट्याला आलेले अपयश, महापौर निवडणूक आणि राज्यसभेच्या निवडणुकीवरून आघाडीमध्ये निर्माण झालेला अंतर्गत कलह यासाठी विरोधकांची कसोटी लागणार आहे.
अजित पवारांची उणीव भासणार
या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उणीव भासणार आहे. गेली साडेतीन दशके विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आपल्या कामाचा ठसा अजित पवारांनी उमटला. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला होता. त्यांच्या अकाली निधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला जाईल. यामध्ये अजित पवार यांच्या आठवणींना आमदार उजाळा देतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून देतील.














Discussion about this post