प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागली असून यात अनेक तंबू, साहित्य जळून खाक झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज महाकुंभच्या सेक्टर -१९ मध्ये ही आग लागली. महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या लोखंडाच्या पूलाच्या खाली असलेल्या तंबूंना ही आग लागली आहे. आग लागल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे. परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. पूलाच्या खाली आग लागल्यामुळे पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. ही आग वाढतच चालली आहे.
महाकुंभाच्या ठिकाणी जेवण बनवत असताना सिलिंडरचा स्फोट झाला त्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण आहे की ती वाढतच चालली आहे. घटनास्थळावर तंबू असल्याने ही आग वाढत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावर रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत.
Discussion about this post