मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतून माधुरी दिक्षीत, जळगावमधून उज्ज्वल निकम, तर धुळ्यातून प्रतापराव दिघावकर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनिल देवधर यांच्या नावाची चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या बैठकीमध्ये सहभागी नव्हते. लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
बैठकीत आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सागर बंगल्यावर इतर भाजप आणि शिंदे गटातील नेते उपस्थित होते. मात्र अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यां तिघांमध्येच बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर हे ज्याप्रकारे आमदार अपात्रतेबाबतचा प्रश्न हाताळत अहेत, त्यावर ताशेरे ओढले होते. तसेच याप्रकरणी कारवाई कुठपर्यंत पोहचली, याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता ही सुनावणी वेगाने केली जाऊ शकते. त्यामुळे यामध्ये येणार निर्णय आणि त्याचे पुढील राजकारणावर होणारे परिणाम याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
Discussion about this post