जळगाव । जळगाव जिल्ह्यात लंम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये आढळून आल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत:
१) कासोदा (ता. एरंडोल), पारोळा, धरणगाव व रावेर येथील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत.
२) आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतरतालुका पशुवाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात यावी. फक्त लंपी प्रतिबंधक लस टोचून २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांस वाहतुकीस प्रमाणपत्रासह परवानगी दिली जाईल.
३) पशुधन एकत्र येणारी सार्वजनिक चराई व पाणी हौद पुढील १५ दिवस वरील बाधित तालुक्यांत बंद ठेवण्यात यावेत.
४) बाह्य किटकांचा नाश व गोठ्यांची स्वच्छता यासाठी ग्रामपंचायतींनी पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने फवारणी करावी.
५) मृत जनावरांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने ४x८ फुट खड्ड्यांद्वारे करण्यात यावी. आवश्यक असल्यास बांधकाम विभागाची मदत घ्यावी.
६) खाजगी पशुवैद्यकीय पदविकाधारकांनी LSD संदर्भातील माहिती शासनास देणे बंधनकारक असून त्यांच्या उपचारांवर नियंत्रण ठेवले जाईल. परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई होईल.
७) सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करावी.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुधनाच्या आरोग्यास बाधा पोहोचू नये म्हणून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Discussion about this post