जळगाव । जळगाव तालुक्यातील रामेश्वर येथे एक दुर्दैवी घटना घडलीय. येथील नदीवर काकूसोबत अंघोळीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिपीका बरडे असं मृत चिमुकलीचे नाव असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले चंपालाल बरडे हे कामानिमित्ताने धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे स्थायिक झाले आहे. त्यांच्या शेजारी त्यांची वहिनी अवनी बारेला देखील राहतात. दरम्यान ४ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास चंपालाल यांची मुलगी दिपीका बरडे ही काकूसह त्यांची मुलगी सिंधू व शेजारील मुलगी रिधू बारेला यांच्यासोबत नदीवर आंघोळीसाठी गेली होती. अंघोळ करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरुन दीपीका पाण्यात बुडाली.
सदर घटनेची माहिती गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात मुलीचा शोध घेतला. मात्र दीपिका हीच शोध लागला नाही. तर दुसऱ्या दिवशी (५ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजेच्या जळगाव (Jalgaon) तालुक्यातील रामेश्वर येथे दीपीका हीचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. पाण्यात मुलीचा मृतदेह मिळून आल्याची माहिती मिळताच चंपालाल यांनी रामेश्वर येथे धाव घेतली. पाण्यात मिळून आलेला मृतदेह त्यांच्या मुलीचा असल्याची त्यांनी ओळख पटविल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.