सौर ऊर्जा प्रकल्पाला जागा देण्यात जळगाव जिल्हा क्रमांक एकवर
जळगाव | गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या वीजेबाबतचा प्रश्न अत्यंत गंभीर विषय झाला आहे. मात्र शासनाने कुसुम योजनेअंतर्गत मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आज पाचोरा तालुक्यातील लासलगाव येथे 5 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळणार असल्यामुळे आपल्याला आनंद झाल्याची भावना व्यक्त करून येत्या काळात पाचोरा – भडगाव मध्ये असे प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या उदघाटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, कार्यकारी अभियंता, लासलगावचे सरपंच, गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
शासन सौर ऊर्जेसाठी प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांसाठी हीं सुवर्ण संधी आहे. या प्रकल्पामुळे लासगाव ग्रामपंचायतील दरवर्षी पाच लाख रुपये मिळणार आहेत. हा निधी गावाच्या विकासासाठी वापरता येईल. मात्र हा प्रकल्प व्यवस्थित चालेल याची काळजी गावकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, आता इथल्या शेतकऱ्यांना रात्री जागरण करण्याची गरज पडणार नाही, आता दिवसाही शेतीसाठी वीज मिळेल. या ठिकाणच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम एक दिवसही थांबले नाही, खुप कमी काळात हा प्रकल्प उभा राहिला. विकासाचे काम करतांना ग्रामस्थांचे काही मतभेद असले तरी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाकडे यावं, त्यातून तोडगा निघतो. विकास प्रकल्पाचे काम थांबवू नये, त्यामुळे विकासाला खीळ बसते. लासगावच्या ग्रामस्थांनी मदत केल्यामुळेच असा विकासाला चालना देणारा प्रकल्प उभा राहिला. जळगाव जिल्हा सौर ऊर्जा प्रकल्पाला जागा देण्यात राज्यात पहिल्या स्थानी आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांनी केले. त्यात त्यांनी जिल्ह्यात अधिकाधिक सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
Discussion about this post