मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. त्यामागील कारण म्हणजे ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने धक्कादायक दावा केलाय. ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवलं गेलं होतं. मी सर्व गोष्टींचा खुलासा करणार, असं ललित पाटील याने म्हटलं आहे.
दरम्यान, ललित पाटील याच्या या वक्ताव्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. तर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन मोठा दावा केलाय.
ड्रग्ज माफिया ललित पाटीललामुंबई पोलिसांनी त्याला बंगळुरु येथून अटक केलीय असून त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यावेळी पोलीस त्याला कोर्टाच्या बाहेर घेऊन आले तेव्हा त्याने मी ससूनमधून पळालो नाही तर मला पळवं गेलं, असं स्पष्ट म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ललित पाटील याच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येणार असून बोलणाऱ्यांची तोंडे बंद होणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप
ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयात 9 महिन्यांपासून उपचार घेत होता. त्याला ससूनमध्ये ठेवण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. त्यावर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय. ललित पाटील याला ससूनमधून पळवण्यासाठी कोणी गाड्या दिल्या? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. तर ललित पाटील याला मॅनेज करुन पकडण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय.
Discussion about this post