मुंबई : लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय. या योजनेचा १४,२९८ पुरुषांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना २१.४४ कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले. यामुळे सरकारचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या डेटा पडताळणीत हा गैरव्यवहार उघड झाला आहे.
‘लाडकी बहीण योजना’ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली असून, जून २०२५ पर्यंत या पुरुषांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा होत होते. या कालावधीत प्रशासनाच्या नजरेतून हा प्रकार कसा सुटला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेचा उद्देश २१ ते ६५ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १,५०० रुपये देऊन स्वावलंबी बनवणे हा आहे. मात्र, पुरुषांनी या योजनेचा गैरलाभ घेतल्याने योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पडताळणी दरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. सुमारे २३ हजार ६०१ लाभार्थ्यांनी महिलांची नावे वापरून योजनेचा लाभ घेतल्याचा संशय आहे. या संशयित अर्जांची सखोल तपासणी सुरू असून, त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि प्रशासकीय बेजबाबदारपणावर बोट ठेवलं जात आहे.
‘लाडकी बहीण योजना’साठी सरकारला वार्षिक ४२,००० कोटी रुपये खर्च येतो. यातील २१.४४ कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने पुरुषांच्या खात्यात गेल्याने इतर कल्याणकारी योजनांवर परिणाम होत आहे. ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती आणि महायुती सरकारच्या निवडणूक यशाचं एक कारण मानली जाते. मात्र, या घोटाळ्यामुळे योजनेच्या आर्थिक शाश्वततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Discussion about this post