मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जून महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले. मात्र आता जुलै महिना संपायला अवघे काही दिवस राहिले असून यामुळे जुलै महिन्याचा लाभ कधी मिळणार महिलांचे लक्ष लागलं आहे. आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे.
या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत मिळेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच असून, ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा पहिला लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख बहिणींना मिळाला होता, त्यानंतर ही संख्या कमी-जास्त होत गेली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारने सध्या ही प्रक्रिया थांबवली आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिली आहे.
छाननी प्रक्रिया सध्या स्थगित
यासाठी, प्राप्तीकर भरणार्या महिलांच्या कुटुंबांचा डेटा केंद्रीय अर्थ खात्याकडून राज्य सरकारने मागवला होता. हा डेटा मिळाल्यावर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांची छाननी होईल अशी शक्यता होती. मात्र, आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका विचारात घेता, ही छाननी प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाईल. त्यानंतरच सरकार छाननीबाबत पुढील पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे.
Discussion about this post