मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार पुन्हा एकदा लाडक्या बहिणांसाठी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना आता शून्य टक्के व्याजदरात कर्ज मिळणार आहे. महिलांना उद्योग व्यवसायात स्वावलंबी करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला आहे. याबाबत मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.
‘राज्य सरकारच्या ४ महामंडळाच्या योजना अशा आहेत की, १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे, ज्या योजनेतून महिलेला १२ टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. यासह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे, आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं, असं गणित प्रवीण दरेकर यांनी यावेळी मांडलं.
एका महिलेला १ लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं, त्यात ५ ते १० महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक आणि संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिव होते, ज्यासमवेत झालेल्या बैठकीतून या चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे, मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला १ लाखापर्यंत कर्ज मिळेल, त्यासाठी व्यवसायाच्या तपासणी केली जाईल. व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वयंपूनर्विकास हाऊसिंगचं ज्या पद्धतीने केलं, तसेच हेही सध्या मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, त्यामध्ये १२ ते १३ लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत. तर, १ लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.
Discussion about this post