जळगाव : जळगाव जिल्ह्यातून लाचखोरीची आणखी एक प्रकार समोर आला असून यात ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले असून यामुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे (५४), लिपीक निलेश मोतीलाल चांदणे (४५) आणि कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील (२७), अशी अटकेतील संशयितांची नावे असून या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना सडावण शिवारात तसेच अन्य तीन नातेवाईकांच्या शेतामध्ये बांबू लागवड करायची होती. त्याअनुषंगाने शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड-वृक्ष लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी चार प्रकरणे त्यांनी पारोळा सामाजिक वनीकरण विभागाकडे सादर केली होती.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी कापुरे यांना भेटुन बांबू लागवडीसाठी दाखल केलेली प्रकरणे मंजूर करण्याची विनंती तक्रारदार शेतकऱ्याने केली. तेव्हा चार प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रूपयांप्रमाणे एकूण ४० हजार रूपये लागतील, असे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदाराने जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीप्रमाणे लाच मागणीची पडताळणी केली असता वन परिक्षेत्र अधिकारी मनोज कापुरे आणि लिपीक निलेश चांदणे यांनी तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांची बांबू लागवड संदर्भात चार प्रकरणे मंजूर करण्याकरिता प्रत्येकी १० प्रमाणे ४० रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती ३६ हजार रुपये लाचेची मागणी पंचांसमक्ष करून सदरची रक्कम कंत्राटी कर्मचारी कैलास पाटील यांच्याकडे देण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे कैलास पाटील याने पंचांसमक्ष लाच स्वीकारली. तिन्ही संशयितांच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने यशस्वी केली.
वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी तक्रारदाराकून सुमारे २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी चाळीसगाव तहसील कार्यालयातील महिला तलाठी विरोधात नुकताच गुन्हा दाखल झाला. याशिवाय, काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रशांत ठाकूर आणि संजय दलाल हे दोघे महसूल सहाय्यक जाळ्यात अडकले होते. दुसऱ्या प्रकरणात जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनील भागवत यांनाही तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. आतापर्यंतच्या या सर्व प्रकरणांमुळे जळगाव जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे.
Discussion about this post