▪️ शास्त्रशुद्ध शेतीबरोबर शाश्वत शेती करण्याचे आवाहन
▪️ खरीपपूर्व नियोजन बैठकीत थ्रेशर, ट्रॅक्टर वाटप
▪️ अपघातग्रस्त कुटुंबांना विमा अनुदान, निविष्ठांचे वितरण
जळगाव | खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व नियोजन बैठक अत्यंत महत्त्वाची असून ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या श्रमाचे नियोजन असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी दिलेली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडावी. अधिकारी व कर्मचारी यांनीही ही बाब लक्षात घेऊन काम करावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगून खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे जळगाव व धरणगाव तालुक्यांकरिता संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी बदलत्या हवामान व संभाव्य खरीप आव्हानांवर चर्चा करत शेतकऱ्यांना शाश्वत, शास्त्रशुद्ध शेतीसाठी सज्ज राहण्याचे मार्गदर्शन केले.
पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन :
यंदा तापमान अत्यंत वाढले असून मशागतीची कामे शक्यतो सकाळी लवकर पूर्ण करावीत. निसर्गचक्र बदलत असल्याने धूळपेर टाळावी आणि बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी आंतरपीक व मिश्रपीक पद्धती अवलंबाव्यात. अनधिकृत कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत. खरेदीचे पक्के बील घेऊन ते हंगाम अखेरपर्यंत सुरक्षित ठेवावे.
गावपातळीवरील कृषी सहाय्यक व विस्तार अधिकाऱ्यांनी नियमित शेतशिवार भेटी द्याव्यात, तसेच सेवा कार्य अधिक गतिमान होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व इतर रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांना दिले.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थी – पूजा संदीप भालेराव, सुनंदा अशोक सपकाळे व गणेश लक्ष्मण सपकाळे यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले. अपघातग्रस्त कुटुंबांना बियाणे व निविष्ठा मोफत वितरित करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
या बैठकीदरम्यान कुवारखेडे येथील शेतकरी वंदना श्रीराम पाटील यांना थ्रेशर, तर दिलीप सोनवणे व हिराबाई कोळी यांना ट्रॅक्टर वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला.
विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी सांगितले की, नाशिक विभागातील खरीपपूर्व नियोजन बैठकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होत असून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आवश्यक निविष्ठा पोहोचविण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने घेतले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी आत्मा व कृषी विभागाच्या वर्षभरातील कार्याची सविस्तर रूपरेषा मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित भामरे व श्रीमती सुरेखा सपकाळ यांनी केले. आभारप्रदर्शन कृषी अधिकारी शरद पाटील यांनी मानले. या बैठकीस प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक विलास सोनवणे, कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सरला पाटील, कृषी अधिकारी धीरज बढे, किरण देसले, शरद पाटील, वैभव सूर्यवंशी, तुषार गोरे, दीपक नागपुरे, नरेंद्र पाटील तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post