धुळे । अजित पवारांनी काही आमदारांसह केलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अनेक नेते पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात प्रवेश करत आहे. यामुळे शरद पवारांना मोठे धक्के बसत आहे. यातच आता धुळे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील नेते व प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे हे शरद पवारांच्या गटाची साथ सोडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा अनिल गोटे यांनी गुरुवारीच पक्ष श्रेष्ठीकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार की, शिवसेनेत (ठाकरे गट) जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ते याबाबत काय भूमिका स्पष्ट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनिल गोटे हे धुळे शहराचे माजी आमदार आहेत. सन २०१४ मध्ये भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर भाजपमध्ये त्यांचे अंतर्गत वाद झाल्याने त्यांनी २०१९ मध्ये भाजपचा राजीनामा देवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षात गोटे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना धुळे मतदारसंघातून पक्षातर्फे उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजितदादांसह काही आमदार बाहेर पडल्याने दोन गट निर्माण झाले. अजितदादांनी भाजप-शिवसेनेबरोबर (शिंदे गट) जावून सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते अजितदादांच्या गटात जात आहेत.
Discussion about this post