मुंबई । महाराष्ट्रात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना कल्याणनजीकच्या बापगाव परिसरात घडलीय. येथील १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेला असलेल्या चक्की नाका परिसरामध्ये राहणारी १३ वर्षांची मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानामध्ये गेली होती. बराचवेळ ती घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. ९ तासांपासून मुलगी घरी न आल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी शेवटी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तर ही मुलगी दुसऱ्या दिवशी बापगाव परिसरामध्ये मृतावस्थेत आढळून आली.
या मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालातून मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. या हत्येप्रकरणी दोन आरोपींची नावं समोर आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी विशाल गवळी फरार आहे.
विशाल गवळीविरोधात आधीच विनयभंगाचे ५ गुन्हे दाखल आहेत. विशालने या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह बापगाव परिसरामध्ये फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. कोळशेवाडी पोलिसांनी विशाल गवळीच्या शोधात ६ पथकं तयार केली आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
Discussion about this post