मुंबई । लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी असूनजुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसापासून लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करीत होते. अखेर आता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा होणार आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याच्या हप्त्याची घोषणा करताना ट्वीट करत म्हटले की, ‘लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ! माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (1500 रुपये) वितरित करण्यात येणार आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता 8 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
दरम्यान, ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता या योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं आहे. तब्बल 26.34 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.
Discussion about this post