जामनेर । जळगांव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वरील पहूर येथील वाघुर नदीच्या पुलाचे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी पहूर येथे चक्क पत्रकार बांधवच रस्त्यावर उतरले. तब्बल तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे चारही रस्त्यांवर शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या . अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभागाचे अभियंता संदीप पाटील यांनी सदर पुलाचे काम महिनाभरात पूर्ण करतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर आणि पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना शहर पत्रकार संघटनेतर्फे महामार्ग संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले .
पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघुर नदी पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .प्रारंभी याच पूल परिसरात रखडलेल्या पुलामुळे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप स्वर्गीय अरुण मोरे , स्वर्गीय राहुल पावरे यांच्यासह प्रतिभावंत बालकवयित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे या शाळकरी विद्यार्थिनीच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
महामार्ग प्रशासनाची लक्तरे वेशीवर . . .
पहूर गावचे भूमिपुत्र राज्य शासनाच्या ‘मेरी ‘ चे सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची लक्तरेच वेशीवर टांगली . ते म्हणाले ‘ वेळेत काम पूर्ण करता येत नसेल तर ,तुम्ही अभियंत्यांनी जीव द्यावा , सिंचन घोटाळा जसा समोर आला , तसाच मोठा घोटाळा या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये देखील समोर येऊ शकतो . त्यांच्या ज्वलंत भावनांनी सारेच वातावरण संतप्त झाले होते .















Discussion about this post