जळगाव । मित्रांना भेटण्यासाठी दुबईहून आलेल्या तरुणाच्या बॅगमधून सोन्याची चेन, दोन पेंडल असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना जळगाव शहरातील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये समोर आली होती. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी दोन तासातच या गुन्ह्याचा छडा लावला असून, हॉटेलमधील रिसेप्शनिस्टनेच दागिने चोरी गेल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
त्याच्याकडून चोरीला गेलेला माल जप्त करण्यात आला आहे. धुळ्यातील रहिवासी राहुल मधुकर जाधव हा हल्ली दुबई येथे वास्तव्यास आहे. २० मे रोजी राहुल हा जळगावात मित्रांना भेटण्यासाठी आला होता. तो हटिल स्टार पॅलेसमध्ये थांबला होता. दरम्यान, प्रकृती खराब झाल्याने त्याच्याजवळील बॅग रिसेप्शन काउंटर ठेवून दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. २१ रोजी उपचार घेऊन आल्यावर त्याने रिसेप्शन काउंटरवरून त्याची बॅग घेतली; पण त्यातील सोन्याची चेन, दोन सोन्याचे पेंडल चोरीला गेल्याचे दिसून आले. त्याने जिल्हापेठ ठाणे गाठून तक्रार दिली
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी; स्टाफची केली चौकशी
गुन्हे शोध पथकातील सलीम तडवी, अमितकुमार मराठे, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, जयेश मोरे यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. तसेच संपूर्ण स्टाफची कसून चौकशी केली. त्यावेळी रिसेप्शनिस्ट केतन धोडू पाटील (वय २९, रा. पाळधी, ता. मुक्ताईनगर) याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच हॉटेलच्या २०३ क्रमांकाच्या खोलीत दागिने लपवल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दागिन्यांसह केतन पाटील याला ताब्यात घेतले आहे.
Discussion about this post