मुंबई । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तसेच त्यांच्या वडिलांबद्दलही पडळकरांनी अपशब्द वापरला होता. या टीकेचा निषेध जयंत पाटील यांच्या समर्थकांनी केला.मात्र, जयंत पाटील यांनी पडळकरांना कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर दिले नव्हते.
मात्र आता इस्मामपूर येथील कार्यक्रमात आयोजित केलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचे उत्तर देऊ, तोपर्यंत वाट बघू. टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम तर होणारच. असे जयंत पाटील म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचले होते. त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना तंबी दिली. पण त्यानंतरही पुन्हा पडळकरांनी टीका करताना सीमा ओलांडली. आता या सगळ्याचा समाचार जयंत पाटील यांनी घेतला आहे.
एका व्यक्तीने माझ्या आईवडिलांबद्दल चुकीची भाषा वापरली, त्यानंतर या व्यक्तीच्या समर्थनासाठी सगळ्यांनी मिळून सभा घेतली. भाजपमध्ये हा प्रकार मी कधी बघितला नव्हता. या सगळ्यामुळे आमच्या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकांची प्रतिक्रिया वेगळी आहे. हे सगळं जाणुनबुजून केले जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात सगळ्यांनी मिळून बऱ्याच गोष्टी केल्या असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पद सोडल्यानंतर जयंत पाटील शांत असल्याची चर्चा होत होती. अखेर याविषयी देखील त्यांनी स्पष्टीकरण देत माझा मतदारसंघातील जनसंपर्क बराच कमी झाला होता. पण आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नसल्याने आता मला लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटता येत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.















Discussion about this post