मुंबई : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बंडखोर नेत्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. वायबी चव्हाण केंद्रात ही भेट झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भेटीत काय झालं ते सांगितलं.
जयंत पाटील म्हणाले, विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेत्यांची अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये बैठक सुरू होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचा फोन आला. शरद पवार यांनी तातडीने बोलावले, असं सांगितलं. राष्ट्रवादीमधून सत्तेत गेलेले सर्व मंत्री, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्यांनी शरद पवार यांना दिलगिरी व्यक्त केली. त्यातून काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
विरोधी पक्षनेत्यासंदर्भात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे आमदार आमच्यापेक्षा जास्त असतील, तर विरोधी पक्षनेतेपदाची जागा ही काँग्रेसकडे जाईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. अधिवेशन सुरू झाल्यावर ती प्रक्रिया सुरू होईल. २० आमदार आमच्याकडे आहेत. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत बोललो. ते वरिष्ठांशी बोलतील. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षनेत्याने राजीनामा दिला. त्यामुळे उरलेल्या पक्षांशी विचारविनिमय घेऊन विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल.















Discussion about this post