जळगाव | दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात दिनांक १ जून २०२५ पासून करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागणार असून, नोंदणीसाठी अंतिम तारीख २९ जुलै २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत जिल्ह्यातील निर्धारित परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत आणि अचूक माहिती भरून ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ११,४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा या नोंदणीत १०% वाढ होईल असा अंदाज असून, त्यानुसार योग्य नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, तसेच त्यांना अर्ज भरताना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post