जामनेर । नीलगायींच्या कळपाला घाबरून गाडीला जुपलेले दोन बैल बिथरल्याने त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील ढालगाव शिवारात घडली. यामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले असून जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही बैलांना बाहेर काढण्यात आले.
ढालगाव शिवारातील एका शेतात अरुण आत्माराम पर्वते हे बैलगाडी घेऊन सायंकाळच्या सुमारास चारा आणण्यासाठी गेले होते. बैलगाडी उभी ठेवून ते गाठोडे गाडीत टाकत होते, त्याच वेळी नीलगायींचा कळप तिथे आला. या नीलगायींच्या कळपाला घाबरून बैलांनी गाड्यासह शेतातून पळ काढला. या पळापळीत बैलांसह बैलगाडी शेताच्या बांधावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली.
अरुण पर्वते यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे शेतकरी आणि शेतमजूर शेतात पोहोचले. परंतु त्यापूर्वीच बैलजोडी विहिरीत पडली होती. काही वेळानंतर जेसीबीच्या साहाय्याने या बैलांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत दोघे बैल मृत झाले होते. या घटनेत शेतकऱ्यांचे ८० हजार ते १ लाख रुपयाचे नुकसान झाले.
Discussion about this post