जळगाव : गुंतवणूक करून त्यातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आश्विन केशवलाल पटेल (४०, रा. टेलिफोननगर) यांची पाच लाख ६४ हजार रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शनिवार, १३ जानेवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्विन पटेल यांच्याशी २७ नोव्हेंबर ते १० जानेवारीदरम्यान फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अज्ञातांनी संपर्क साधला. एका रसायन कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. यादरम्यान वेळोवेळी पटेल यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने पाच लाख ६४ हजार रुपये घेतले.
बरेच दिवस झाले तरी नफा तर मिळालाच नाही. उलट मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पटेल यांनी शनिवार, १३ जानेवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.















Discussion about this post