जळगाव । जळगावात महिला पोलिसानेच दोन महिला पोलिसांना सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास ज्यादा नफा देण्याचे आमिष दाखवून ३० लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी अर्चना पाटील (रा. आशाबाब नगर) या आरोपी महिला पोलिसास अटक करण्यात आली. फिर्यादी महिला पोलिस शिपाई मंगला सुभाष तावडे या पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहायक कक्षात कार्यरत आहे.
२०१७ ते जानेवारी २०२४ या कालावधीत त्या एमआयडीसी पोलिसात कार्यरत होत्या. सन २०२२ मध्ये अर्चनाने मंगलाला सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगितले. १४ जानेवारी २०२२ रोजी मंगलाने तिला ७० हजार रूपये दिले. २ एप्रिल रोजी १ लाख दिले, पुन्हा दीड लाख, नंतर २ लाख रुपयेही दिले. अर्चना तिला वेळोवेळी चांगला परतावा देत होती. असे मंगलाने अर्चना, मोनिका व अर्चनाची मैत्रीण मनिषा चव्हाण, अर्चनाची मुलगी मानसी रवींद्र पाटील यांच्या खात्यावर टप्प्याटप्याने २० लाख रूपये पाठवले. काही दिवसांनी मंगला यांची मैत्रीण, महिला पोलिस शिपाई वैशाली गायकवाड यांनाही अर्चनाने गुंतवणूकीचे आमिष दाखवले. मंगलानेही खात्री दिली. त्यावर विश्वास ठेवून वैशाली यांनी घर विकून आलेले १० लाख रुपये रक्कम अर्थना, तिचा मित्र मिरखाँ नुरखाँ तडवी, बहिणीचा मुलगा विजय पवार यांच्याकडे गुंतवण्यास दिले.
ठकबाज महिला निलंबित
अर्चनाने एक, दोन नव्हे तर २० ते २५ लोकांची फसवणूक केल्याची कुणकुण डिसेंबरमध्ये लागली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात काही महिला तक्रार देण्यासाठी देखील आल्या होत्या. एवढेच नव्हे तर अर्चनाविरुद्ध तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिला निलंबित करण्यात आले आहे.
Discussion about this post