जळगाव । जळगाव महानगर पालिकेसाठी महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाला आहे. त्यामुळे आता जळगावचा महापौर कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जळगावात महायुतीने मोठं यश मिळविलं आहे. यात भारतीय जनता पक्षाने 46, शिवसेनेने 22 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. शिवसेना-उबाठाच्या पाच जागा निवडून आल्या असून एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले नव्हते.
महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा जाहीर होणार आहे. अखेर आज महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार जळगाव महानगर पालिकेसाठी महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाला आहे. यानंतर आता जळगावच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार ? याची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीत अनेक ओबीसी महिला जिंकून आल्या आहेत. त्यामुळे कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान लेवा पाटीदार समाजातील महिलेला महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे यांचे नाव आघाडीवर आहे. तर दीपमाला मनोज काळे यांचे नाव देखील महापौरपदाच्या चर्चेत आहे. गायत्री इंद्रजीत राणे या देखील मोठ्या दावेदार आहेत.
यासोबत माजी महापौर तथा पुन्हा निवडून आलेल्या जयश्री सुनील महाजन या देखील या पदाच्या दावेदार आहेत. त्यांनी यापूर्वी महापौरपदावर काम केलं आहे. दुसरीकडे वैशाली अमित पाटील यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. अंकिता पंकज पाटील यांना देखील लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या नावांपैकी एकीला जळगावच्या महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.















Discussion about this post