जळगाव । जळगाव शहरवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मोठी वाढ झाली आहे. वाघूर धरणात सध्या ८२.७५ टक्के पाणी साठा आहे. परिणामी शहराची पाणी टंचाई मिटली आहे.
जिल्ह्यात या महिन्यात आतापर्यंत सात दिवस पावसाचे होते. त्यात १५४.२ मिलीमिटर पाऊस झाला. जुलै व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये वाढ झाली असून, पाणी टंचाई मिटण्याच्या मार्गावर आहे.
जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या ८२.७५ टक्के पाणी साठा आहे. खरिप हंगामात उत्पादनात घट असली, तरी चांगल्या सिंचनामुळे रब्बी हंगामात चांगले उत्पादन येण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, वाघूर धरणात गतवर्षी ८४.७१ टक्के जलसाठा होता. यंदा तो ८२ टक्क्यावर आहे. यासोबतच काही लहान प्रकल्पही शंभर टक्के भरली आहेत. इतर प्रकल्पांतही जलसाठा होत आहे. यामुळे रब्बीच्या हंगामाला याचा फायदा होणार आहे.
या महिन्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील कापसाला फायदा झाला आहे. उडीद, तूर, मुग, सोयाबीन पिकांचे ७५ टक्के नूकसान झाले आहे. एका बिघ्याला केवळ पाऊण ते एक पोते उडीद, तुरीचे उत्पादन आले आहे.
पावसाच्या ओढीने जिरायती कापसाला मोठा फटका बसणार होता. तो आताच्या पावसाने कमी प्रमाणात बसेल. मात्र, बागायती कापूस दिवाळीत बाजारात विक्रीस येईल. तर जिरायती कापूस अजून गुडघ्यापर्यंतच असल्याने त्याला नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये बोंडे फुटतील, असे चित्र आहे.
Discussion about this post