विद्यापीठात ‘स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
जळगाव l शिक्षण म्हणजे माहिती नव्हे तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या मूळ क्षमता आणि परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे असे स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाविषयी मत मांडलेले आहे. वर्तमान शैक्षणिक धोरणात त्याचा विचार केला गेला आहे असे प्रतिपादन प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. १८ मार्चपासून ‘स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात बीजभाषण करतांना प्रा. पाठक बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.एन.के.ठाकरे, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संचालक प्रा.म.सु.पगारे व प्रा.मधुलिका सोनवणे, निमंत्रक प्रा.अतुल बारेकर उपस्थित होते.
प्रा. प्रकाश पाठक म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये उमलण्याची क्षमता असते.क्णाला केवळ विकसन करायचे आहे. शहाणपण नावाच्या कर्मात परिवर्तीत होत नाही शिक्षणाला अर्थ नाही. शिक्षणातून पूर्णत्वाचा प्रवास व्हायला हवा. ज्या शिक्षणातून चारित्र्य, तत्व प्राप्त होते. ते शिक्षण स्वामी विवेकानंद यांना मान्य होते. मनाची शक्ति आणि बुध्दीचा विस्तार तसेच स्वत:च्या पायावर उभे राहायला मदत करते अशा शिक्षणाची गरज आहे अशी त्यांची धारणा होती. शिक्षणाने व्यक्तींना समाजाची सेवा करण्यास सक्षम केले पाहिजे आणि मानवतेच्या उन्नतीसाठी योगदान दिले पाहिजे. यावर स्वामी विवेकानंद यांचाविश्वास होता असेही प्रा. पाठक म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी तरूणांचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झालेली आहे. अशा वेळी पालक, शिक्षक आणि महापुरूष हे या तरूणांनादिशा दाखवू शकतात असे मत मांडले. दृष्टी, शिस्त, आवड आणि नैतिक मूल्ये यांची गरज असल्याचेही सांगून प्रा. माहेश्वरी यांनी हॅण्ड, हार्ट आणि हेड या तीन H चा विचार नवीन शैक्षणिक धोरणात केला असल्याचे सांगितले. राजेंद्र नन्नवरे यांनी भारतीय समाज ज्ञानाची जोपासना करणारा असल्यामुळे अभ्यास करून नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार केला गेला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. म.सु. पगारे यांनी मनोगत व्यक्त केले. निमंत्रक प्रा. अतुल बारेकर यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मुंदडा व ऋग्वेद देशमुख यांनी केले. उद्घाटना नंतरच्या चर्चासत्रात डॉ. एन.के. ठाकरे, डॉ.पराग जहागीरदार (जळगाव), डॉ. अपर्णा लळीकर (पुणे) यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य जगदीश पाटील, प्रा. अनिल डोंगरे हे यावेळी मंचावर उपस्थित होते. उद्या दि. १९ मार्च रोजी संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांचे निबंध सादरीकरण होईल. दुपारी डॉ.विश्वास देवकर (पुणे) यांच्या उपस्थितीत व प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. या चर्चासत्राला भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद भारत सरकार यांनी सहकार्य केले.
Discussion about this post