जळगाव | खेलो इंडिया स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास एक सुवर्ण तर एक कांस्य पदक प्राप्त झाले आहे.
नोएडा येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील भारोत्तोलन ७३ किलोग्रॅम वजन गटात विद्यापीठ खेळाडू किरण मराठे (व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर) याने सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी चंदीगढ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ भोरोत्तोलन स्पर्धेत या खेळाडूने रौप्य पदक प्राप्त केले होते. या स्पर्धेतून प्रथम आठ खेळाडू निवडले गेले त्यामध्ये किरण मराठेचा समावेश होता. अत्यंत चुरशीची स्पर्धेत मराठेने सुवर्णपदक पटकावले आहे. प्रशिक्षक म्हणून प्रा.उमेश पाटील यांनी काम पाहिले.
तसेच लखनऊ येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील ५०००मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रिंकी पावरा (जी.टी.पी.महाविद्यालय नंदुरबार) हिने १६ मिनीटे ५९ सेकंदात स्पर्धा पूर्ण करुन कास्य पदक प्राप्त केले. यापूर्वी चेन्नई येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेत तीने रौप्य पदक प्राप्त केले होते. प्रशिक्षक म्हणून डॉ.शैलेश पाटील (धनदाई महाविद्यालय, अमळनेर) यांनी काम पाहिेले.
किरण मराठे व रिंकी पावरा यांच्या यशाबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी अभिनंदन केले अशी माहिती क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी दिली.