जळगाव । गेल्या काही दिवसांत हाडे गोठवणाऱ्या थंडीने जळगावकर त्रस्त झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील थंडीचा जोर ओसरला आहे. जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी ९ अंशांवर असलेले रात्रीचे तापमान रविवारी १५ अंशावर आले होते. केवळ दोन दिवसांत जळगावच्या रात्रीच्या तापमानात ६ अंशांची वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासांत पुढे सरकणार आहे. यामुळे पूर्व-ईशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसांत राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे.
किमान तापमानात वाढ झाली आहे. यासह जळगाव जिल्ह्यात २७ व २८ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यासह जिल्ह्यात आर्द्रता वाढणार असून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला ब्रेक मिळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Discussion about this post