जळगाव । जळगाव जिल्ह्यात काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे ढगाळ वातावरणामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात घट नोंदवली गेली होती. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता तापमानात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
दोन दिवसापूर्वी ३७ अंशावर असलेलं तापमान आता ३९ अंशावर आलं आहे. यामुळे जिल्ह्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. रविवारी जळगाव शहरात ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. सुट्टीचा दिवस असल्याने उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी रविवारी दुपारी घराबाहेर पडणे टाळल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती.
मार्च महिन्यात सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमानाची नोंद झाली, शिवाय एप्रिलमध्येही उन्हाची तीव्रता कायम आहे. जळगावकरांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट अनुभवली होती. वातावरणातील घडामोडींमुळे सोमवारपासून पुन्हा तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी दुपारी बारा ते चार या वेळेत कारणाशिवाय उन्हात फिरायला जाणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.















Discussion about this post