जळगाव : जिल्ह्यात एकीकडे लोकसभा निवडणुकांमुळे राजकारण तापले असताना, दुसरीकडे आता सूर्यदेवदेखील चांगलाच तापू लागला आहे. मंगळवारी शहराच्या तापमानाने ४२ अंशांचा पारा गाठला. या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली आहे. २० एप्रिलपर्यंत तापमानाचा जोर असाच राहण्याची शक्यता असून दोन दिवसात तापमान ४३ अंशाच्या वर जाण्याची शक्यता देखील वळविली जात आहे. उष्णतेच्या लाटेच्या काळात दुपारच्या वेळेस महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर निघणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले
यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेची दाहकता अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे तापमान खालावले होते. परंतु पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशावर गेला आहे.जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचा अनुभव येत आहे.
तापमानात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. राज्यात उष्णतेची हि लाट पाहण्यास मिळत असून तापमान पुन्हा एकदा ४१ अंशाच्या वर गेले आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॅरा ४२ अंशावर पोहचला होता. मात्र एप्रिलचे काही दिवस अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. हवेत देखील गारवा निर्माण झाला होता. मात्र सूर्याने पुन्हा एकदा आग ओकण्यास सुरवात केल्याची अनुभूती येत आहे. कडक उन्हाचा जनजीवनावर परिणाम होत असून, दुपारी शहरातील वाहतूक काहीशी मंदावलेली असते.