जळगाव । जळगाव तालुक्यातील सजा करंज येथील तलाठ्याविरुद्ध ५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. अजय बिडवे असं लाच मागणाऱ्या तलाठ्याचे नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे
काय आहे प्रकरण ?
तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील रहिवाशी असून त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने संबंधित तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात शेती खरेदी केली होती. या खरेदी केलेल्या क्षेत्राची अधिकृत नोंद सरकारी दप्तरी लावण्यासाठी सजा करंजचे तलाठी अजय बिडवे यांनी ५ हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. वारंवार होणाऱ्या या मागणीला कंटाळून तक्रारदाराने २७ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.
प्राप्त तक्रारीची दखल घेत ‘एसीबी’ने त्याच दिवशी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी तलाठी बिडवे यांनी ५ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला, मात्र पैसे स्वीकारण्याच्या वेळी तलाठी बिडवे यांना काहीतरी संशय आला आणि त्यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. रक्कम स्वीकारली नसली तरी, लाचेची मागणी करणे हा देखील गुन्हा असल्याने त्यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव ‘एसीबी’चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या पथकाने या मोहिमेचे यशस्वी नियोजन केले.














Discussion about this post