जळगाव : महायुती सरकारमधील काही मंत्र्यांची छायाचित्रे झळकवत जळगाव शहरात शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने आज सोमवारी जनआक्रोश आंदोलनातून महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत माजी खासदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वाजतगाजत ‘प्रतिकात्मक अंतयात्रा’ काढण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही यात्रा आणली. या वेळी सरकारविरोधी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा जाळण्यास आडकाठी करण्याचा प्रयत्न केला असता मात्र शिवसैनिकांनी पारंपरिक पद्धतीने आंदोलन करून पुतळ्याला अग्निडाग दिला.
उमेश पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘एक रुपया पीक विमा योजना’ सध्याच्या सरकारने बंद केली. 21 दिवस पाऊस खंड पडल्यास मिळणारी अग्रिम मदत शेतकऱ्यांना आता मिळत नाही. तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेतून काही लाभार्थी वंचित आहेत.
गुलाबराव पाटील, भुसावळचे मंत्री यांच्यावरही त्यांनी टीका केली. टेक्सटाईल पार्क, गिरणा प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, औद्योगिक प्रकल्प अशा अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित केले. नगराध्यक्ष करण पवार यांनी पन्नास खोके प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला. भाजप केवळ सोशल मीडियावर धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकार शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन बाळगते, त्यामुळे आता सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल, असे ते म्हणाले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील, दिलीपसिंह राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post