जळगाव | लोकसभा निवडणुकीतील पराभवचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या जळगावातील जिल्हा कार्यालयात बैठक पार पडली यात जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांचा बैठकीतच राजीनामा घेण्याचा ठराव संमत करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष ओबीसी असण्यासह इतर समाजघटकांना कार्यकारिणीत स्थान मिळावे, अशी सूचना पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
याप्रसंगी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अरूणभाई गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र पाटील यांच्यासह अन्य नेते व पदाधिकार्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जामनेरचे डॉ. मनोहर पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. तर डॉ. सतीश पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतांना आगामी काळातील निवडणुक लक्षात घेता जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा निरिक्षक प्रसन्नजीत पाटील यांची देखील उपस्थिती होती.
दरम्यान, डॉ. सतीश पाटील यांनी एक जिल्हाध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष नेमावेत अशी सूचना देखील याप्रसंगी केली. तर रवींद्रभैय्या पाटील यांनी राजीनामा वरिष्ठांना पाठवून दिल्याचे नमूद केले. तर आता जिल्हाध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post