जळगाव – नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत झाला. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगाव ते कन्नड दरम्यानचा प्रवास अधिक गतीमान आणि सुलभ होणार आहे. सध्या जळगावहून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तास लागतात. मात्र, हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडल्यास हा प्रवास अवघ्या एक तासात पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हा प्रवास समृद्धी महामार्गाने चार तासांत पूर्ण होतो. त्यामुळे एकूणच जळगाव ते मुंबई हा प्रवास आता फक्त पाच तासांत शक्य होणार आहे.
औट्रम घाटात 12.75 किमीचा बोगदा
चाळीसगाव ते कन्नड दरम्यानच्या औट्रम घाटात 12.75 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 2600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बोगद्यामुळे घाटमाथ्यावरील वाहतुकीचा त्रास कमी होणार असून प्रवासात लक्षणीय वेळ वाचणार आहे.
Discussion about this post