जळगाव । शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांची शहरातील पिंप्राळा येथे सभा होत आहे. सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ कोणावर धडाडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जळगाव येथील महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. मात्र, दुसरीकडे सरकारने त्याला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जाहीर सभेत त्यांची तोफ आज कोणावर धडाडणार याकडे लक्ष राहणार आहे.
सकाळी दहा वाजता विमानाने ते जळगाव विमानतळावर येत आहेत. सकाळी दहा वाजता त्यांच्या हस्ते महापालिकेत उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच अकरा वाजता पिंप्राळा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे, तर दुपारी एक वाजता त्यांची पिंप्राळा येथील मानराज पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
राज्य सरकारने राजशिष्टाचार मुद्दा पुढे करीत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या पुतळा अनावरण करण्यास स्थगिती दिली आहे, तर आम्ही सर्व शासकीय परवानग्या पूर्ण केल्या आहेत, तरीही सरकार हेतुपुरस्सर स्थगिती देत असल्याचा आरोप महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते पुतळा अनावरण करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे.
Discussion about this post