जळगाव | जळगावचे रँचो व विविध पुरस्काराने सन्मानित “मस्ती की पाठशाला”चे संचालक जहांगीर शेख (पेंटर) यांनी राज ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवत मनसेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी मनसेचे उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा उपस्थित होते.
“थ्री इडियट” या चित्रपटामध्ये दिसलेली चक्की स्कूटर जहांगीर शेख यांनी जळगाव मध्ये बनवलेली आहे. यामुळे जहांगीर शेख संपूर्ण देशात प्रकाश झोतात आले होते. पहिली पर्यंत शिक्षण झालेल्या जहांगीर शेख यांचे त्यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई, पाटील माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, टायटॅनिक चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून, थ्री इडियट चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी, चित्रपट अभिनेता आमिर खान, चित्रपट अभिनेत्री करीना कपूर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्वल निकम यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले होते.
टाकाऊ वस्तु मधून उपयोगी वस्तू बनविण्यामध्ये जहांगीर शेख यांचा हातखंडा आहे. त्यांच्या नावावर विविध सहा पेटंट आहेत. स्कूटर चक्की, स्कूटर एअर कॉम्प्रेसर, स्कूटर वॉशिंग मशीन, अशी अनेक यंत्रे त्यांनी बनवली आहे. नॅशनल इनोव्हेशन सेंटर दिल्ली येथेही त्यांचा सन्मान झाला आहे. मस्ती की पाठशाला द्वारे जळगाव जिल्ह्यासह देशातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या कार्यशाळा सातत्याने सुरू आहेत.
जहांगीर शेख यांचा मनसेमध्ये प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या रोजगार स्वयंरोजगार या अंगीकृत संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्यात बेरोजगार तरुणांकरता मोठं काम करता येईल. याकरिता जहांगीर शेख यांच्यासह राज ठाकरे, अमित ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















Discussion about this post