जळगाव । राज्यात सध्या पावसाचा जोर वाढलेला दिसून येत असून राज्याती अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. दरम्यान, आज आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यातील ९ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यात जळगाव जिल्ह्याला देखील अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने ६ विभागांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यासह नऊ जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस कोसळेल. गुरूवारी राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या ९ जिल्ह्यांना काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर आणि रायगडला पुढील तीन दिवस, ठाणे आणि रत्नागिरीला पुढील दोन दिवस तर मुंबई आणि सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान, या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असून नागरिकांना कामानिमित्तच घराबाहेर पडा, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल रेल्वेसेवेलाही बसला आहे. पावसाचं पाणी ट्रॅकवर साचल्याने बुधवारी मुंबईतील लोकलसेवा धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
Discussion about this post