जळगाव । पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
काय म्हणाले जिल्हाधिकारी?
या अपघातात सहा ते आठ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचं जळगावचे जिल्हाधिकारी म्हणाले. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी बचाव पथक पोहोचल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
Discussion about this post