जळगाव | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य सुरू आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. गंभीर जखमींवर पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच पाचोरा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पालकमंत्र्याकडून घटनास्थळीचा आढावा
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ते म्हणाले, “मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत.”
घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चा देखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकार व रेल्वे विभागाच्या संपर्कात जिल्हा प्रशासन
घटनेच्या अनुषंगाने रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मदतकार्य जलदगतीने सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
मृतांच्या कुटुंबिंयाना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार
पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
Discussion about this post