जळगाव : जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हैदराबाद, गोवानंतर आता जळगाव विमानतळावरून लवकरच पुणे विमानसेवाही सुरू होणार आहे. त्यासाठी ‘फ्लाय ९१’ या कंपनीने २४ व २६ मे रोजी ट्रायल फ्लाइटचे नियोजन केले असून तिकीट विक्री सुरु केली आहे.
मागील तीन वर्षांपासून जळगाव विमानतळावरून बंद असलेल्या विमानसेवा सुरु करण्यासाठी ‘फ्लाय ९१’ या कंपनीने पुढाकार घेऊन मागील महिन्यात हैदराबाद, गोवा विमानसेवा सुरु केली. यानंतर जळगाव-पुणे विमानसेवा सुरु करण्याच्या हालचाली सुरु होत्या. ‘फ्लाय ९१’ या कंपनीच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या जळगाव ते पुणे विमानसेवेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.
ही विमानसेवा २४ आणि २६ मे अशी दोनच दिवस चालवण्यात येणार असली, तरी प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन नियमित केली जाऊ शकते. दरम्यान, जळगावहून पुण्याला फक्त सव्वा तासात पोहोचता येणार आहे. प्रवासभाडे दोन हजार रुपयांपर्यंत असणार आहे.
…असे असेल वेळापत्रक
जळगावहून पुण्यासाठी २४ आणि २६ मे रोजी झेपावणाऱ्या विमानाची वेळ आणि तिकीट बुकिंगसाठीची अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार जळगाव ते पुणे हे विमान दोन्ही दिवस दुपारी २ वाजून १० मिनिटांनी उड्डाण घेईल. त्यानंतर ३ वाजून २५ मिनिटांनी पुण्यात उतरेल. परतीच्या प्रवासाला निघालेले विमान पुण्यात दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी जळगावसाठी उड्डाण घेईल आणि सव्वा तासाने ५.२० वाजता जळगावला उतरेल.
Discussion about this post