पाळधी । यावर्षी मोठ्या खंडानंतर जळगाव जिल्ह्यातील धूव्वांधार पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर शहरासह पाळधी येथे मुसळधार पाऊस झाल्याने अनेक घरांत, दुकानांत पाणी शिरून नुकसान झाले. पाळधीत चार तासात १४४ मिलीमिटर पाऊस झाला. पोलिस ठाण्यातही पाणी शिरल्याने पोलिसांचे हाल झाले.
पाळधी (ता. धरणगाव) येथे मध्यरात्री झालेल्या अचानक पावसामुळे नाल्याला पूर आला. पोलीस चौकीमध्ये पाणी शिरल्याने पोलिसांना धावपळ करावी लागली. पोलिसांना रात्र जागून काढावी लागली. पाऊस अचानक सुरू झाला, त्यावेळी नागरीक झोपेत होते. हा पाऊस साधारण चार तासांपर्यंत एकसारखा सुरू होता.
त्यामुळे नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी दुकानात शिरल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. सकाळी उठल्यावर दुकानदारांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. पाण्याची पातळी पाहून ते फक्त पाहात उभे होते. सकाळी पाणी ओसरल्यानंतर त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला. त्यात किराणा, कृषी केंद्र, शिंपीची दुकाने, मोबाईल दुकानदार यांचे अतोनात नुकसान झाले. पोलीस चौकीमध्ये पाणी शिरल्याने त्यांनाही आपले दप्तर वाचविण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यांच्या गाडीत पाणी शिरल्याने तीही बंद झाली.
महामार्गावरील वाहतूक ठप्प
महामार्गावरील वाहतूकही या पावसामुळे ठप्प झाली होती. उड्डाण पुलाखालील बोगद्यात पाणी साचल्याने गावात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. शेतातील पिके आडवी झाली असून, शेतकरी वर्गाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, रविवारी (ता. २४) सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
Discussion about this post