जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील तीन- चार दिवसांपासून उष्णतेची लाट आली असून जिल्ह्यात तापमान वाढीने कहर केला आहे. जिल्ह्यात उच्चांकी ४६ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. तापमान वाढीने उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून यामुळे जळगावकर अक्षरक्ष: हैराण झाला आहे. आणखी चार पाच दिवस तापमानाचा पारा जास्त राहणार आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन- तीन दिवसांपासून सलग ४४ अंश तापमान राहिले. मात्र यात दोन अंशांनी वाढ होऊन पारा ४६ अंशांवर पोहचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. सूर्य जणूकाही आग ओकत असल्याचा अनुभव जळगावकरांना येत आहे. यामुळे अगदी सकाळी दहा वाजल्या पासूनच उन्हाचे चटके जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत. परिमाणी दुपारच्या वेळी शहरातील रस्ते अगदी निर्मनुष्य होत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानंतर आता जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अचानकपणे वाढलेल्या तापमानामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून तापमानाने गाठलेल्या विक्रमी पातळीच्या सर्वाधिक परिणाम हा जनजीवनावर होत आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आगामी आठ दिवसात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने देण्यात आलेले आहे.
Discussion about this post