जळगाव । जळगाव आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सध्या आठवड्यातून केवळ चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार आहे. 26 ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमान दररोज उड्डाण करणार आहे. दिवाळीच्या काळात या दोन्ही सेवा सुरळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवासह पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी सध्या विमानसेवा सुरू आहे. पैकी मुंबईसाठी अलायन्स एअर कंपनीकडून आतापर्यंत आठवड्यातून चार दिवस विमानसेवा दिली जात होती. मात्र, प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर २६ ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे.
मुंबईकडे व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे मुंबईसाठी दररोज विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे. जळगाव आणि मुंबई या शहरांमधील प्रवास आणखी सोयीस्कर आणि वेगवान होऊ शकणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई विमानतळावरून सायंकाळी ७:१० वाजता जळगावसाठी विमान उड्डाण घेईल आणि रात्री ८:२५ वाजता जळगाव विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे जळगावहून मुंबईसाठी रात्री ८:५० वाजता विमान उड्डाण घेईल. आणि मुंबई विमानतळावर रात्री १०:१० वाजता पोहोचेल. सध्या २६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. तर जळगावहून मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. २६ ऑक्टोबरनंतर दोन्ही बाजूने दररोज विमानसेवा उपलब्ध असेल. ज्याचा लाभ प्रवासी नियमितपणे घेऊ शकतील.
याशिवाय, जळगाव विमानतळावरून आठवड्यातून चार दिवस सायंकाळी ७:२० वाजता अहमदाबादसाठी विमान उड्डाण घेईल. ही सेवा जळगावहून रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू असेल. तर अहमदाबाद विमानतळावरून आठवड्यातून चार दिवस दुपारी ५:४० वाजता जळगावसाठी विमान उड्डाण घेईल आणि सायंकाळी ६:५५ वाजता जळगाव विमानतळावर पोहोचेल. अहमदाबादहून ही सेवा रविवार, मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी सुरू असेल.















Discussion about this post