जळगाव । जळगाव शहरातील मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी महापालिकेकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शहर महानगरपालिकेने मर्यादित कालावधीसाठी ‘शास्ती माफी’ अभय योजना जाहीर केली असून, ५ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करावरील दंड पूर्णपणे माफ करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
महापौर दीपमाला काळे यांनी योजनेची माहिती देताना सांगितले की, या योजनेत नागरिकांना केवळ मूळ कराची रक्कम भरून आपली थकबाकी पूर्णपणे मिटवता येणार आहे. त्यामुळे नागरिकांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार असून महानगरपालिकेच्या महसुलातही वाढ होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेने कर भरणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये क्यूआर कोड स्कॅनिंग, नेटबँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्ड, तसेच UPI ॲप्स जसे फोनपे, गुगल पे इत्यादींचा समावेश आहे. महापौरांनी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याचे आवाहनही केले आहे.
महानगरपालिकेच्या दृष्टीने ही योजना महसूल वाढीसाठी महत्त्वाची ठरणार असून, शहरातील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासही मदत होईल. थकबाकीदारांनी १५ दिवसांच्या या विशेष कालावधीत पुढाकार घेऊन आपली थकबाकी नियमित करावी, तसेच भविष्यातील दंड आणि अडचणी टाळाव्यात, असे प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट केले आहे.















Discussion about this post