जळगाव । जळगाव महापालिकेतील लिपिकासह कंत्राटी कर्मचाऱ्याला पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
याबाबत असे की, तक्रारदाराने जळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावरील आधुनिक सार्वजनिक शौचालय चालवण्यास मिळावी म्हणून निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्याकरीता त्यांनी महापालिकेकडे निविदा भरताना सुमारे ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे भरली होती. मात्र, निविदा मंजूर न झाल्याने त्यांनी अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी २९ जुलै रोजी महापालिकेकडे अर्ज केला. त्या अर्जासंदर्भात महापालिकेतील लिपीक आनंद चांदेकर यांची भेट घेतली असता, अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच त्यांनी मागितली.
लाच द्यायची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी करण्यात आल्यावर लिपीक चांदेकर यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे त्यांनी लाचेची रक्कम स्वतःकडे न घेता शहर समन्वयक राजेश पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचला. तक्रारदाराने पाच हजार रूपयांची रक्कम दिली आणि ती पंचासमक्ष संशयित लिपीक आनंद चांदेकर यांनी राजेश पाटील याच्यामार्फत स्वीकारली. या प्रकरणात संशयित चांदेकर आणि कंत्राटी कर्मचारी राजेश पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली सुरेश पाटील, बाळू मराठे आणि भूषण पाटील यांनी सदरची कारवाई यशस्वी केली.















Discussion about this post