जळगाव । महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांत झालेल्या बदलांमुळे राज्यभर थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. उत्तरेकडून येणार्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे तापमानात झालेली घट महाराष्ट्रात गारठा वाढवण्यात मदत करीत आहे. या थंडीच्या लाटेमुळे धुळे येथील कृषी महाविद्यालयात बुधवारी तापमानाचा पारा पुन्हा एकदा ४.४ अंश सेल्सियसवर घसरला आहे.
आज राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव, निफाड, यवतमाळ, परभणी कृषी विद्यापीठ, गोंदिया, अमरावती आणि बुलडाणा येथे तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने या भागातही गारठा वाढत आहे. ब्रह्मपुरी येथे गेल्या २४ तासांत ३४.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे, तर उद्यापासून राज्यात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही थंडीची लाट पसरल्यामुळे पुन्हा गारठा वाढला आहे. सकाळच्या सुमारास थंडीचा तडाखा पाहायला मिळत आहे आणि पहाटेच्या सुमारास थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. शहरी भागात तापमानाचा पारा १० अंशाखाली तर सातपुडा पर्वत रांगेत तापमान ८ अंश सेल्सियसवर गेला आहे.
वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरून काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.















Discussion about this post